Saturday, July 21, 2018



#समर्पण 
#सोबती 

त्यांचे  सगळ्यात जास्त प्रेम अनुज वर आहे असं आमचं सगळ्यांचं म्हणणं असे पण खरं सांगायचं तर 'आम्ही सगळे' ही पूर्णपणे त्यांची जबाबदारी ते समजायचे ... 
दैनंदिन गोष्टीपासून चार हात दूर राहणारं आणि आपला दरारा मात्र कायम ठेवणारं घरातल्या बुजुर्ग व्यक्तीचं हे रूप मोक्याच्या क्षणी हमखास प्रकट व्हायचं ... 
घरात ते आणि मी एकटेच असताना अचानक रात्री लाईट गेल्यावर एक  आश्वस्थ सोबत ...  
छोट्या रमाला कुणी रोजची घरातली-नेहमीची नसलेली व्यक्ती जेव्हा नुसतंच उचलून घेई तेव्हा साशंक सोबत ...  आणि नजरकैद ही !
जेवणाची वेळ झाली की स्वयंपाक घराकडे अस्वस्थ येरझाऱ्या .. 

त्यांच्या अगदी उतरत्या वयात म्हणजे  वयाच्या 'चौदाव्या' आणि माझ्या अठ्ठाविसाव्या वर्षी आमची पहिली भेट झाली ...   
आमच्या पहिल्या भेटीत त्यांच्या टिपिकल स्वभावाप्रमाणे त्यांनी पाहून न पाहिल्यासारख्या केलं आणि आपल्या जागेवर जाऊन बसले. 
त्यानंतर आमची रोजची नजरानजर ही याच वाटेवर असायची .. पण तू माझीच एक आहेस हा विश्वास त्यात होता हे कळायचं, जाणवायचं ... 
मूक संवाद त्यांचा आणि माझं सारखं  "सरकून बसतोस का रे" ... "का जातोस बाहेर चान्स मिळाला की" .. "वय बघा आणि मग बाहेरच्यांशी पंगा घ्या" .. "अरे ती कुत्री तुझ्या नातीच्या वयाची आहे तिला का भुंकतोयस "... अशा तक्रारी ... 


घरात शिरलेला उंदीर मारणे हे निधड्या छातीचे काम करताना या आमच्या सेनापतीचा उजवा हात होण्याचं भाग्य मला लाभलं ...आम्ही सगळे सैनिक डिरेकशन द्यायला आणि मग एका अनुभवी योद्ध्यासारखं तो एकच घाव (म्हणजे चाव ) घालून काम तमाम करी  ... वय जसं वाढत होतं तशा हालचाली काहीशा मंदावल्या होत्या पण एकाच चाव्यात उंदराचा श्वास तोडून ते शव आमच्याकडे फेकून ज्या ऐटीत स्बिगो परत दाराशी आसनस्थ होई त्या दृश्याला तोड नाही ... 


दोन वर्षांपूर्वी जेव्हा तीन महिन्याचा मर्फ घरी आला तत्क्षणी चेहऱ्यावर उमटलेली नाराजी  स्बिगो ने अखेर पर्यंत तशीच ठेवली ... काही दिवसातच त्याने मर्फ ला संपूर्णपणे दुर्लक्षायला सुरुवात केली ...  
स्बिगो ला जाऊन आता वर्ष होईल ... 
मर्फ साठी एक जबरदस्त एक्झाम्पल सेट करून ... अगदी फक्त शेवटचा अर्धा तास आपल्या मालकाला जवळ बसायला सांगून त्याच्या नजरेत पाहत शांतपणे  स्बिगो गेला ... 

सतरा वर्षांपूर्वी अनुज एकटा शाळेतून येताना पावसात हे छोटं पिल्लू सोबतीला आलं आणि अनुज-सुमित ने त्याचं नामकरण केलं 'स्बिगो'.  तेव्हा डिक्शनरी मिनिंग नसलेला हा शब्द आता 'समर्पण' याअर्थाने आम्हा सगळ्यांच्या मनात कायमचा विराजमान झालाय.