Thursday, July 3, 2014

चढाओढ

चुरगळलेली नोट दोन दातात गच्च पकडून तो शांत पावले टाकत होता … जून टळून गेला तरी न आलेल्या पावसाने जमीन सुद्धा एकटक जिकडे क्षितिजाकडे आस लावून बसलेली तिकडे ५०० रुपयाची मळकट नोट या गावाबाहेरच्या कुंभारवाड्यात दुर्लक्षिली जाणे केवळ अशक्य. 

दात कोरत बसलेला दामजी एकी कडे दारोदारी घरकाम करणाऱ्या त्याच्या बायको कडे लक्ष ठेवून तिरप्या नजरेने 'त्याला' न्याहाळत होता … महिन्याची ३० तारीख म्हणजे बायको रिकाम्या हाती थोडीच येणार … 
पण फडफडणारी नोट त्याचाही नजरेतून सुटली नव्हती. 

पायाला आलेल्या फोडाला डांबराचे चटके सहन न झाल्याने 'तो' मात्र उलट फिरून परत आल्यापावली झाडाच्या सावलीला  चालत निघाला … 

पिच्की बोरे आणि ओलसर मिठाचा डबा ठेवलेली पाटी सावलीला सरकवायच्या निमित्ताने भानू पण झाडाजवळ येउन टेकली …. आज जसा काही धंदा इथेच होणार होता … 

सड्यावरच्या खोताच्या म्हातारीचं तेरावं घालून लगबगीने वाटेला लागलेल्या गोरटेबाला नोटेच्या वासाने कि काय सावलीतच पडावं  वाटू लागलं … 

लंगड्या बहिणीच्या जीवावर फोन बूथ च्या नावाखाली बिडी काडी विकणाऱ्या जन्याचं  पण त्याच्या खोपटा मधून समोरच्या झाडाखाली चाललेल्या नाटकात पूर्ण लक्ष होतं …. 

अलगत दात पुढ मागं केल्यामुळे मळक्या कागदाची तुरट चव तोंडात पसरत होती … पण हातात झोपलेलं २-४ दिवसाचं कुत्र्याचं पिल्लू परत कण्हू लागेल श्या भीतीनं 'तो' हात गच्च पोटाशी बांधून एकचित्ताने त्या पिलाचे ठोके मोजीत होता …. नजर मात्र चौफेर भिरभिरत होती आणि दामजी ला त्या नजरेतली वेडसर झाक इतक्या दुरूनही  टोचली … 

तेवढ्या दहा बारा फुटाच्या जागेत दूरवर चाललेल्या कुत्र्याच्या भून्कण्याबरोबर  आत्ता दिवास्वप्नांची चढाओढ सुरु होती …. रात्री ची सोय काय…. कर्जाचा हप्ता काय. नवं लुगडं काय… थकलेलं भाडं काय … 

जन्या आता हातात सुकी भाकर घेऊन पुढे सरसावला … एवढा धिप्पाड गडी चप्पल वाजवत येताना पाहून तो दचकून उभा राहिला आणि बावचळलेले पिल्लू कुई कुई करू लागलं …. घशाशी येणाऱ्या आंबट ढेकराबरोबर गोरटेबाला एकदम उबळ आली आणि बघता बघता जीव ओकतोय असा गोरट्या ओकला …. दमून परतलेली  दामजीची  बायको फतकल  घालून  बसताना नेमकी ओसरीवर धडपडली आणि दचकलेला दामजी हिरडीत घुसलेल्या सुई मुळे बोंबलत मोरीत पळाला …. 

"आर. …दे तुझ्या कुत्र्याला आणि आण तो कागद …. त्याला भाकरी घालू खायला " … जन्याने पिल्लू हिसकावून घेतलं आणि नोट घेऊ लागला … चरफडत भानू बोटं मोडू लागली आणि काही कळायच्या आत वेडीपिशी झालेल्या त्या उकीर्ड्या वरच्या कुत्रीने जन्याच्या हातातलं पिल्लू जन्याच्या अंगठ्याच्या नखासकट हिसकावल …. 'तो' भेलकांडत मागे गेला आणि जन्याच्या हातातले नोटेचे दोन कपटे जन्याने अंगठ्यावर दाबून धरले …  

कुत्री पळून गेलेल्या वाटेवर एकटक नजर लावून 'तो' शांतपणे तसा  चालू लागला …टाळूला चिकटलेली नोटेची दुमडती बाजू त्याने जिभेनेच बाहेर काढून थुंकून टाकली …

काही झालेच नाही अशा अविर्भावात भानू आपली पाटी उचलून चालू लागली … आता जेव्हा ती मिठाच्या डब्यात हात घालणार होती तेव्हाच तिला शिटलेल्या कावळ्याचा प्रसाद मिळणार होता …