Saturday, April 22, 2017

नाव



#ताचीच्यागोष्टी 

"नेऊ, काल रात्री रमा रडत होती नाय? ऐकू आलं मला" काठी बाजूला ठेवत गादी वर हळू बसत 'ताची' म्हणाली आणि त्यानंतर तिचं typical वाक्य "मी जागीच असते रात्रभर ... अधेमधे लागते झोप ". मी आणि आई ने एकमेकींकडे हसून मनातल्या मनात म्हंटलं "नेहमीचंच हिचं". मोठ्या तायांनी बोबड्या वयात 'आजी'चं 'नाव' 'ताची' केलं आणि ती आमची सगळ्यांचीच ताची झाली. 

"माझ्याकडे दे रमाला.. मान तूच धर हा पण .." किंचित कंप हाताला पण डोळ्यातले भाव मात्र वर्षानुवर्षं तसेच.. खानदानी आणि मिश्किल. हल्ली साडी झेपत नसल्याने गाऊन घालते ती तर आम्हालाच चुकल्या चुकल्या सारखं होतं. मी म्हणूनच यावेळी पुण्याला परत येताना तिच्या अजून एका साडीची गोधडी करून आणली.  

"बाळाचे बाबा आणि आजी येणार का या शनिवारी" सगळ्यांची बित्तम बातमी ठेवण्याची जी काही आवड आहे ना तिला ... मी म्हंटलं "मग काय .. येणार ना... यावेळी रमाचा काका पण येणारे !"
तशी मान हलवून हसत म्हणते "बरंय .. छान कपडे शिवते हा  बाळाची आजी ".. ताची कडून इतपत येणं म्हणजे उच्चं कोटीची compliment .. हे आता आम्हाला सगळ्यांना इतक्या वर्षात माहित झालंय. 

"माझा 'दादा' झाला तेव्हा रात्री कुणीच नाही आलं बागवे हॉस्पिटलात. 'हे' सकाळी आवरून आले तो पर्यंत वाडीतल्या गण्याचा आजोबा येऊन गेला होता आणि म्हणाला 'दीनानाथ' नाव ठेव"
"आमच्यावेळी हे असच असायचं"
मी म्हंटलं "त्यावेळी हॉस्पिटल वगैरे म्हणजे आश्चर्य आहे!" तर म्हणते "मुंबईत होतं कोण बघणारं .. माझंच पहिलं लग्न माझ्या माहेरचं "

माझ्या लेकीचं नाव 'रमा' ठेवलं तेव्हा ताची म्हणाली "बरंय ". आम्ही सगळ्यांनीच निःश्वास टाकला 'याचा अर्थ आवडलय'!

माहेरची मोठी मुलगी आणि वालावलकरांची मोठी सून या पदव्या सांभाळताना तिचं मोठं होणारं रूप आम्ही बरंचसं ऐकलंय आणि खूप वेळा पाहिलंय. तिच्या आजच्या रूपात हे सगळं झाकून पाहताना घडून गेलेला काळ आणि माणसं एकमेकांना कसे बांधले गेलेत हे पाहून थक्क व्हायला होतं. 

काल तिला थोडं बरं वाटत नसल्याचं कळलं. अठ्याऐशीव्या वर्षी अशा छोट्या मोठ्या कुरबुरी तर असणारच ना. पण त्यामुळे परत एकदा खूप खूप गोष्टी डोळ्यासमोरून तरळून गेल्या. त्याबद्दल थोडं थोडं लिहायचं ठरवलंय जसं जमेल तसं.