Saturday, April 22, 2017

नाव



#ताचीच्यागोष्टी 

"नेऊ, काल रात्री रमा रडत होती नाय? ऐकू आलं मला" काठी बाजूला ठेवत गादी वर हळू बसत 'ताची' म्हणाली आणि त्यानंतर तिचं typical वाक्य "मी जागीच असते रात्रभर ... अधेमधे लागते झोप ". मी आणि आई ने एकमेकींकडे हसून मनातल्या मनात म्हंटलं "नेहमीचंच हिचं". मोठ्या तायांनी बोबड्या वयात 'आजी'चं 'नाव' 'ताची' केलं आणि ती आमची सगळ्यांचीच ताची झाली. 

"माझ्याकडे दे रमाला.. मान तूच धर हा पण .." किंचित कंप हाताला पण डोळ्यातले भाव मात्र वर्षानुवर्षं तसेच.. खानदानी आणि मिश्किल. हल्ली साडी झेपत नसल्याने गाऊन घालते ती तर आम्हालाच चुकल्या चुकल्या सारखं होतं. मी म्हणूनच यावेळी पुण्याला परत येताना तिच्या अजून एका साडीची गोधडी करून आणली.  

"बाळाचे बाबा आणि आजी येणार का या शनिवारी" सगळ्यांची बित्तम बातमी ठेवण्याची जी काही आवड आहे ना तिला ... मी म्हंटलं "मग काय .. येणार ना... यावेळी रमाचा काका पण येणारे !"
तशी मान हलवून हसत म्हणते "बरंय .. छान कपडे शिवते हा  बाळाची आजी ".. ताची कडून इतपत येणं म्हणजे उच्चं कोटीची compliment .. हे आता आम्हाला सगळ्यांना इतक्या वर्षात माहित झालंय. 

"माझा 'दादा' झाला तेव्हा रात्री कुणीच नाही आलं बागवे हॉस्पिटलात. 'हे' सकाळी आवरून आले तो पर्यंत वाडीतल्या गण्याचा आजोबा येऊन गेला होता आणि म्हणाला 'दीनानाथ' नाव ठेव"
"आमच्यावेळी हे असच असायचं"
मी म्हंटलं "त्यावेळी हॉस्पिटल वगैरे म्हणजे आश्चर्य आहे!" तर म्हणते "मुंबईत होतं कोण बघणारं .. माझंच पहिलं लग्न माझ्या माहेरचं "

माझ्या लेकीचं नाव 'रमा' ठेवलं तेव्हा ताची म्हणाली "बरंय ". आम्ही सगळ्यांनीच निःश्वास टाकला 'याचा अर्थ आवडलय'!

माहेरची मोठी मुलगी आणि वालावलकरांची मोठी सून या पदव्या सांभाळताना तिचं मोठं होणारं रूप आम्ही बरंचसं ऐकलंय आणि खूप वेळा पाहिलंय. तिच्या आजच्या रूपात हे सगळं झाकून पाहताना घडून गेलेला काळ आणि माणसं एकमेकांना कसे बांधले गेलेत हे पाहून थक्क व्हायला होतं. 

काल तिला थोडं बरं वाटत नसल्याचं कळलं. अठ्याऐशीव्या वर्षी अशा छोट्या मोठ्या कुरबुरी तर असणारच ना. पण त्यामुळे परत एकदा खूप खूप गोष्टी डोळ्यासमोरून तरळून गेल्या. त्याबद्दल थोडं थोडं लिहायचं ठरवलंय जसं जमेल तसं. 

Saturday, March 25, 2017

मोहोर



"वरच्या आळीतले सदतीस उतरवून झाले' रत्नाक्काला ऐकू येईल अश्या आवाजात विश्वासने बायकोला सांगितले. रत्नाक्काने मनातल्या मनात नेहमी प्रमाणे हिशोब केला '... म्हणजे अजून आठवडा तरी जाईल वरची रांग संपायला  .... तोवर होतीलच पाठोपाठ वहाळावरचे ...  ' आणि समाधानाने हसली. 
"अहो दादा .. कुंदाच्या मिस्टरांचा फोन येऊन गेला .. ट्रक भाड्याचं काहीतरी असेल .. बोलून घ्या .. " सगळी जेवायला बसली तेव्हा रत्नाक्काने मोट्ठ्याने सांगितले. भाऊसाहेबांनंतर घराची एकही घडी विस्कटू नये, गोखल्यांचा तोच दरारा कायम राहावा, म्हणून रत्नाक्काने मोठ्या लेकाला, विश्वासला 'अहो दादा' म्हणायला सुरुवात केली आणि तरी विश्वासच्या नकळत त्याच्या प्रत्येक गोष्टीवर बारीक नजर ठेवली. असं जरी असलं तरी विश्वासला याची कल्पना होतीच पण तरीही तो तसं दाखवून ना देता जमेल तसं सगळं पाहत होता . 
तिला बदल खपत नसे आणि विजयचे, धाकट्या भावाचे, वेगळे आणि रत्नाक्कांच्या दृष्टीने 'भलतेच काहीतरी' विचार, यांना तोलताना विश्वासही पूर्वी तारांबळ उडे. हल्ली विजयने मित्राकडे जाऊन शेअर मार्केट शिकायला घेतल्या पासून असे प्रसंग क्वचित येत. आंब्याची अढी लावणे, रोजचा आटवायचा रस बाजूला काढणे, यासारख्या घरच्या ठरलेल्या कामात दोन्ही सुना तरबेज होत्या आणि आक्काच्या तालमीत तयार झालेल्या, आक्क्याच्या मर्जीतल्या, त्यामुळे त्याची काळजी रत्नाक्काला बिलकुल नव्हती.   
दुपारच्याला पोफळी सोलायला कोनाटे वाडीतल्या बायका येत, पेट्या बांधायला सदू येई आणि रत्नाक्का च्या सगळ्यांना 'चा' पाजताना गप्पा होत. हल्ली गडी माणूस मिळणं किती कठीण होत चाललंय याची भीती रत्नाक्का ला छळू लागली होती. सदूचा संजय तालुक्याला नोकरीला होता, मंदाची लेक मास्तरीण होणार पुढल्या परीक्षेनंतर. विश्वासचा योगू पण तालुक्याच्या गप्पा सांगताना थकत नसे आजकाल. रात्री सगळी निजानीज झाली की घरभर पसरलेल्या आंब्याच्या गोड वासात आक्का अजूनच कासावीस होई पुढचा विचार करून.  तसा योगू या सगळ्या कामात तरबेज होता पण विश्वास इतका त्याचा भरवसा आक्काला मनातून वाटत नसे. विश्वास ला पुढे करून सगळं करायला लावणारी आक्काच होती पण योगू च्या सोबतीला कोण असणार! विश्वास चा स्वभाव तसा भिडस्त. तोहून पुढे होऊन योगुला तयार करेलशी शाश्वती आक्काला नव्हती.  दिवस जात होते आणि शेवटचे दोन ट्रक निघायला चारच दिवस राहिले. कामं आटपत आल्याने विश्वास पण बँकेची कामं करायला तालुक्याला गेला. कालच्या बांधलेल्या पेट्या मोजायची आठवण योगूला करून रत्नाक्का तुळशीशी अगरबत्ती लावायला अंगणात आली आणि विश्वासच्या गाडीचा आवाज कानावर पडल्याने लगोलग चहा ठेवायला सांगायला मागे फिरली. तेवढ्यात विश्वास अंगणातल्या झोपाळ्यावरून हाक मारू लागला. सुनेला चहाचं सांगून रत्नाक्का लगबगीने बाहेर आली कारण रोज जेवणाच्या पंगतीत सगळे निरोप सांगणारा विश्वास असा  हाक कसा काय मारतोय. 
"अंग आक्का, भिडे भेटलेले, त्यांचे व्याही बागवाले गणपुले गं, त्यांची जान्हवी यंदा ग्रॅंड्युएट होईल रत्नागिरीच्या शेतकी महाविद्यालयातून. म्हणाले शेती, आंब्याच्या बागा, गोठ्याचा हिशोब सगळं आवडीने करणारी बघणारी आहे. तुमच्या योगुचं पाहताय आता असं कळलं म्हणून तुम्हाला गाठलं "
नवा मोहोर फुटलेल्या आंब्याकडे पाहावं तसं आक्का एक टक विश्वास कडे पाहत उद्गारली "विशू, कित्ती दिवसांनी मला 'अगं आक्का' म्हणालास रे! पूर्वी यांच्याबरोबर तालुक्याला जाऊन आलास की तिथल्या गंमती सांगताना म्हणायचास अगदी तसं!"आणि हसत हसत तुळशी ला प्रदक्षिणा घालू लागली. 
इतक्या वर्षांनी मला विशू म्हणणारी आक्का गोड आठवणींनी भूतकाळात रमली की येणाऱ्या भविष्यकाळाची स्वप्नं रंगवण्यात रमली हे विश्वासला तिच्या स्वप्नाळू नजरेकडे पाहून ठरवता येईना.