Thursday, July 3, 2014

चढाओढ

चुरगळलेली नोट दोन दातात गच्च पकडून तो शांत पावले टाकत होता … जून टळून गेला तरी न आलेल्या पावसाने जमीन सुद्धा एकटक जिकडे क्षितिजाकडे आस लावून बसलेली तिकडे ५०० रुपयाची मळकट नोट या गावाबाहेरच्या कुंभारवाड्यात दुर्लक्षिली जाणे केवळ अशक्य. 

दात कोरत बसलेला दामजी एकी कडे दारोदारी घरकाम करणाऱ्या त्याच्या बायको कडे लक्ष ठेवून तिरप्या नजरेने 'त्याला' न्याहाळत होता … महिन्याची ३० तारीख म्हणजे बायको रिकाम्या हाती थोडीच येणार … 
पण फडफडणारी नोट त्याचाही नजरेतून सुटली नव्हती. 

पायाला आलेल्या फोडाला डांबराचे चटके सहन न झाल्याने 'तो' मात्र उलट फिरून परत आल्यापावली झाडाच्या सावलीला  चालत निघाला … 

पिच्की बोरे आणि ओलसर मिठाचा डबा ठेवलेली पाटी सावलीला सरकवायच्या निमित्ताने भानू पण झाडाजवळ येउन टेकली …. आज जसा काही धंदा इथेच होणार होता … 

सड्यावरच्या खोताच्या म्हातारीचं तेरावं घालून लगबगीने वाटेला लागलेल्या गोरटेबाला नोटेच्या वासाने कि काय सावलीतच पडावं  वाटू लागलं … 

लंगड्या बहिणीच्या जीवावर फोन बूथ च्या नावाखाली बिडी काडी विकणाऱ्या जन्याचं  पण त्याच्या खोपटा मधून समोरच्या झाडाखाली चाललेल्या नाटकात पूर्ण लक्ष होतं …. 

अलगत दात पुढ मागं केल्यामुळे मळक्या कागदाची तुरट चव तोंडात पसरत होती … पण हातात झोपलेलं २-४ दिवसाचं कुत्र्याचं पिल्लू परत कण्हू लागेल श्या भीतीनं 'तो' हात गच्च पोटाशी बांधून एकचित्ताने त्या पिलाचे ठोके मोजीत होता …. नजर मात्र चौफेर भिरभिरत होती आणि दामजी ला त्या नजरेतली वेडसर झाक इतक्या दुरूनही  टोचली … 

तेवढ्या दहा बारा फुटाच्या जागेत दूरवर चाललेल्या कुत्र्याच्या भून्कण्याबरोबर  आत्ता दिवास्वप्नांची चढाओढ सुरु होती …. रात्री ची सोय काय…. कर्जाचा हप्ता काय. नवं लुगडं काय… थकलेलं भाडं काय … 

जन्या आता हातात सुकी भाकर घेऊन पुढे सरसावला … एवढा धिप्पाड गडी चप्पल वाजवत येताना पाहून तो दचकून उभा राहिला आणि बावचळलेले पिल्लू कुई कुई करू लागलं …. घशाशी येणाऱ्या आंबट ढेकराबरोबर गोरटेबाला एकदम उबळ आली आणि बघता बघता जीव ओकतोय असा गोरट्या ओकला …. दमून परतलेली  दामजीची  बायको फतकल  घालून  बसताना नेमकी ओसरीवर धडपडली आणि दचकलेला दामजी हिरडीत घुसलेल्या सुई मुळे बोंबलत मोरीत पळाला …. 

"आर. …दे तुझ्या कुत्र्याला आणि आण तो कागद …. त्याला भाकरी घालू खायला " … जन्याने पिल्लू हिसकावून घेतलं आणि नोट घेऊ लागला … चरफडत भानू बोटं मोडू लागली आणि काही कळायच्या आत वेडीपिशी झालेल्या त्या उकीर्ड्या वरच्या कुत्रीने जन्याच्या हातातलं पिल्लू जन्याच्या अंगठ्याच्या नखासकट हिसकावल …. 'तो' भेलकांडत मागे गेला आणि जन्याच्या हातातले नोटेचे दोन कपटे जन्याने अंगठ्यावर दाबून धरले …  

कुत्री पळून गेलेल्या वाटेवर एकटक नजर लावून 'तो' शांतपणे तसा  चालू लागला …टाळूला चिकटलेली नोटेची दुमडती बाजू त्याने जिभेनेच बाहेर काढून थुंकून टाकली …

काही झालेच नाही अशा अविर्भावात भानू आपली पाटी उचलून चालू लागली … आता जेव्हा ती मिठाच्या डब्यात हात घालणार होती तेव्हाच तिला शिटलेल्या कावळ्याचा प्रसाद मिळणार होता …

Sunday, July 28, 2013

इसीमे है जिंदगी का मिलना


उठ जा पंछी । हवा पुकारे
गली में बिछड़ा पत्ता जाने
हवा का रोख , बारिश का गिरना ,,, इसीमे है जिंदगी का मिलना।

चलती जिंदगी , रुकना सही
सांस मन भरके पिना भी है
तोड़ ना दौड़।रुकना न तू ।  किसी पुकार की बस देर है ।

हस ले तभी जब गिर जाएगा
हाथ दे दोस्त , जब संभल जाएगा
मिटटी भरी सांस जब आजमाओगे , पैरो पे मिटटी तो बनती ही है

तेरा कदम चाहे किसी ओर
साथ जब मन के जब दिल भी है
न शक इस उड़ान के कोई आसपास है ,, आसमान जहा जाओ तेरे साथ है

एक बूंद एक आवाज
कोई तो हो अपने साथ ,, दिल है तो पुकार है
आज  अपना साथ दे। उसपार रोशनी , आज तेरा इंतजार है … 

Friday, March 22, 2013

तू

तेज तू रुद्ध तू
अखंड ज्ञात प्रवासी तू
तप्त तू , तूच मिहिर
वंद्य तू , नित्य तू

तूच प्रियकर झुरत्या निशेचा
सागराचा बांध  तू
तुझ्या पावली पलटे ऋतू
तुझ्या मागुनी चंद्र हसू


कोवळा जन्म तुझा , नित्य क्षणी रंगतदार
नव नवलाई तारुण्याची प्रभा सांडे दारोदार
कर्तृत्वाचे तेज तळपे मध्यांनी दौडत रथ
सांज साजिरी गार पावली नकळत जाई पसरत

तुझ्या स्पंदना वाचून जैसे जग राहाटी थांबली
आसक्त या जीवाला नव संवेदना लाभली
क्षणभंगुर आहे सुख तैसे दुक्ख ही
बालकाचे बाल्य आणिक रसरशीत तारुण्य  ही

नुकती उमलली कळी तरी अखंड प्रवास माथी
ओला  दव कण पिउनि कमळा तुळशीपत्र नच चुकती
तूच सखा तूच ज्ञाता तूच मार्ग दर्शवितो
तूच सत्य तूच शाश्वत तूच जीवन जाणतो  

Sunday, August 5, 2012

तूच माझी सांगाती ..


आज रुतले पाऊल .. सोन-सद्या चाफ्यात ..
नाळे सरशी बांधून मन घुंगरात ..
जोजावल्या अंगाईत कढ रुपेरी चाखून 
काळ्या गोऱ्या बांगडीत माय मनी काढे दृष्ट 

घट्ट वेणी सरशी किती प्राजक्त प्राजक्त 
सया अंगणी रमून मनी माऊ च्या जगात 
चांदण्या चांदण्या जोडता आकार ..
त्यासी ऋतू जाता जाता देत जाई नवे नाव ...

लक्ख आरशाला आता रोज नवी टीट ..
काय वाट पाहे मन .. बंद उघड्या दारात ..
दिस जाती दिसापारी तरी मनास मोहर ...
जात्या दिवसामागे कधी अश्रू मोजीत ..

झाले पाऊल परके आज मंगल दिवस ..
कुणा कसे सांगू आज कातरले मन ..
दूर घंटानाद आज वाटे पहावासा ..
नभी उगवल्या आज लक्ष लक्ष तारा ..

तेवलेली ज्योत त्यात तुझे प्रतिबिंब ..
इवल्या हातात  तुझे माझे एक रूप ..
बिघडले मात्र वाटे सूर नकोसा ...
का वाटे मज हा सूर ओळखीचा ...
खुडलेली कळी फुटला आकांत ...
मना फुलण्याआधी जगण्याची भ्रांत ..
कुणा कुणा थांबवाल .. आज बोलूया स्वतःशी ...
कुणा परक्याच्या आधी .. तूच माझी सांगाती ...
ये ग फुलवीत हास्य ... आज चकोराची साथ ..
अपुऱ्या चित्रावर आज इंद्रधनुचा हात ...




Sunday, June 24, 2012

झेपावलेल्या सूर्याची गोष्ट


शब्दातीत असा हा अनुभव ... 
म्हंटले तर पूर्ण बांधलेले आणि म्हंटले तर अगदीच पाश रहित ..
म्हंटले तर जमिनी पासून सुद्धा तुटलेले आणि म्हंटले तर संपूर्ण परस्वाधीन ...
धडधडत्या अवस्थेतच हळुवार पणे "नसलेली" पायरी उतरताना मनात नक्की काय चाललंय हे नाहीच सांगता येणार 
किव्हा मग हेच ते खरेखुरे रिक्कामे मन..
त्या खेळण्यातल्या विमानासारख्या दिसणाऱ्या विमानात बसण्यापासून ते आपल्या diver trainer बरोबर खरेखुरे हवेत झेपावे पर्यंत वाटणारी भीती ती भीती..
त्यापुढे मात्र सगळा अनुभव अतिशय सुंदर होता ...
आमचा पुराणिक मस्करीत म्हंटलाही होता मला उडी मारण्या पूर्वी.. आपला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून जाईल बर्र का sky diving नंतर ...
फारसं defined आयुष्य न जगणाऱ्या मला आयुष्य नि त्याकडचा दृष्टीकोन यातले गणित वगैरे नाही झेपत ... 
पण हो ... भीती .. अस्थिरता आणि त्यापुढची भीती आणि त्याही पुढची मन सुन्न करणारी अस्थिरता काय असू शकेल याची झलक नक्कीच मिळाली...
पहिल्या श्वासापासून उबदार दुलयीत गेलेले सगळे दिवस आणि मग हे असे त्याबाहेरचे काहीच क्षण ..
२३-३० सेकंदात parachute पूर्ण मोकळे केले जाते आणि मग आपण अगदी घट्ट बांधलेलो आहोत हे जाणवते ..
तेव्हा हवेत खात असलेल्या गटांगळ्या अचानक थांबताना आपण सूर्याकडे झेपावतोय कि तोच अगदी जवळ येतोय असे वाटते आणि एकदम भानावर येतो अरे आपण!
आणि हो त्यां मध्ये बसणारा तो एक जर्क... तो क्षण पकडता यायला हवा ... rather तो येतो ... आणि मग एकदम जाणवते ..चाललोय आपण आपल्या जमिनीशी परत...
आयुष्यात सगळ्यात जास्त granted धरलेली  .. आपली जमीन...
समज आल्या नंतर सतत "पुढची" पायरी ठरवता ठरवता खरच आपण थकलेलो असतो हे लक्षात येते राव अशावेळी ....
त्यामुळे कदाचित हे थरथरते उतरते पाउल एकदम refreshing असते ...

Sunday, July 10, 2011

try करनेको क्या जाताय ..

दुपारभर जास्तच चाललोय खरा मी.
श्या.. सालं ओझं पण अंमळ जडच होतंय ..
कटकट लेकाची .. हे कुत्रं काय मगापासून पायात येतंय सारखं ..
आधीच सांगितलं होत मी .. हे कॅमेऱ्याचे ओझं नकोय मला ..
मला एक कण इंटरेस्ट नाहीये या कशातही ..
काये अरुण ?? अरे हो .. येतोय.. तुम्ही व्हा पुढे.. आणि पायवाट आहे तीच फोलो करतोय.. 
अरेरे .. श्या.. दिसलाच नाही दगड.. 
काय बोर मारतोय हा हरिहरन .. ओये .. सुटला असता iPod हातातून ..
यार बोर दिवस.. आयला .. वेगळाच आकार आहे समोरच्या टेकडीचा ..
हम्म .. या कोण बाई एवढ्या तरातरा पुढे चालल्यात .. जाऊदे मला काय करायचं. ..
पोरगं पण लैच उत्साही दिसतंय आई सारखं ... दादा .. Eclair for u ..
मस्त खळी पडली त्याच्या गालाला .. 
next portrait साठी खळी असणाराच चेहरा हवा .. ऋता ला छान पडते खळी खरतर .. अभ्या साला जीव घेईल .. हाहा ..
अचानक थंड वाटलं यार.. थंडगार सावली .. आणि ते गोळी चोखत धावणारं खिदळणार पोरगं .. 
हम्म.. outdoor assignment चा पण विचार करावा.. 
अत्तारकर सरांशी बोलावंच आधी .. परवा ते इतके lost का दिसत होते.. आणि दुखी सुद्धा.. 
आयशा प्रकरण अंगाशी तर नाही आलं ..
श्या.. मी पण काय साल्या फालतू पोरीन्सारखा गॉसिप करतोय.. हाहा.. तेही स्वतःशीच ..
आहा.. वास भारी येतोय .. काय फुललंय झाड हे .. कसलं आहे कुणास ठाऊक..
आई परवा कसलं ते समोरच्या बागेतल्या फुलाचं त्या मोठ्या झाडाचं भंकस कौतुक मावशीला रंगवून रंगवून सांगत होती..
हा.. पण तो पण एक वास भारी होता..
हम्म.. बकुळ .. 
मानलंय लेका .. फुलाचं नाव आठवतंय ..
काय राव .. काय खरा नै तुमचं .. सोड साला असला विचार .. रसिका काय फाडफाड बोलायची .. 
शॉट आहे यार डोक्याला.. विचाराला  गोळी मारा यार. ..
होय काका .. काढतो जमेल तसा.. अच्छा आई ने सांगितला का तुम्हाला.. career चे माहित नाही आवड म्हणून..
आई पण काहीही सांगत असते कुणाला हि .. हे कोण मला प्रश्न विचारणारे .. 
सुजाता चा पोरगं तू.. इतकी सुंदर रांगोळी काढते ती.. असणाराच तू artist .. 
सान्यांच्या घरी पाहिलं तुझे चित्र परवा.. आहेच तुझ्या बोटात कला ..thank u Kaka.. 
हम्म.. हा.. १ नंबर दिसतेय समोरची दरी नि ती लांबच लांब पसरलेली डोंगरांची रांग ..
अग हो.. होतोच मागे मी.. मला हळूच चालायचं होत .. bottle दे ती..
हो ग .. काढतोय ... तो येतोय डोंगर frame मध्ये.. तू मला सल्ले देऊ नकोस.. मला काढू दे.. नाही तर तू घेऊन टाक..
आई शप्पथ.. १ नंबर आलाय हा फोटो.. तायडी चा कॅमेरा आहे खरा भारी..
एकूणच सगळं पूर्ण complete चित्र वाटतंय.. जिथे बघू तिथे..
सगळे रंग जागच्या जागी.. पण तरीही एकमेकात मस्त मिसळलेले.. 
एक फराटा कुठे चुकला नाहीये.. हवा तेवढा आणि हवा तेवढाच रंग ब्रश मध्ये उचलून direct चितारल्या सारखे ..
इंटरेस्टिंग आणि भन्नाट ..
आहे खरच खुप्प काही काढण्या सारखं..
आई कदाचित हेच तर नव्हती म्हणत ...
चीड चीड करण्या पेक्षा .. सगळ परत चाचपडून बघ..
सरांचे हि असलंच काही तरी.. 
जखडून टाकलंय मी स्वतःलाच .. स्वतःच्याच जगामध्ये ..
आजकाल श्वास म्हणूनच अडखळतो .. कुबट वास सारखाच येतो आपल्या खोलीत हल्ली..
हम्म.. असलंच काही तरी .. करावं..
जमेल कदाचित..
श्या .. तरी आई म्हणाली निघताना ..हळूच आवाजात बोलली बिचारी मला घाबरून.. 
घेत  नाहीस तुझी रंगांची bag..
साली अक्कल काय घास खायला गेली होती काय आपली तेव्हा.. 
कुठे म्हणताय काका .. कळसुबाई ..( हे असाच काहीसं दिसेल नक्की )..
होय होय.. जमेल .. पुढचा रविवार.. नक्की जमेल.. 
try करनेको क्या जाताय ..












Sunday, March 20, 2011

rangiberangi


रंगीबेरंगी ..

खूप उशिरा पर्यंत जागलेले डोळे .. रंग मात्र पिंगट च.. 
अंधारलेली रात्र .. काळी च ती.
रंग नसलेला उसासा ..
आमच्या घरातली एकमेव करडी खुर्ची ..
खिडकी पलीकडचा पिवळट प्रकाश ..

दारातले नुकतेच उमलते जाम्भ्ळत  फुल ..
बेसमेंट च्या खिडकीतले हिरवे पान ..
दोरीवर वाळ्णारा माझा आवडता निळा स्वेटर ..
पिवळे जर्द बुंदी चे लाडू ..
चकाकणारी लालेलाल रिबीन ..
मऊ सुत गुलाबी स्कार्फ ..
आकाशी निळसर खडा ..

आनंदाची उंच उडी ..
लकाक्लेली स्पष्ट वीज ..
एकमेकांना दिलेली टाळी ..
खद खद णारे हास्य ..
गुण गुणलेले गाणं ..
न जमलेली एक शीळ ..
लपवलेले एकच गुपित ..
लुकलुकणारे डोळे...
आणि तो पत्त्याचा डाव ..


ताम्बडत रंगत्या या आकाशाला दिसतंय असे एक रंगीबेरंगी आयुष्य !

होळीचा रंगीबेरंगी शुभेछा !